झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार   

लातेहार, (झारखंड) : झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये झारखंड जन मुक्ती परिषदेचा (जेजेएमपी) प्रमुख पप्पू लोहारा याचादेखील समावेश आहे. लोहारा याच्या नावावर दहा लाखांचे बक्षीस होते.या चकमकीत एक नक्षलवादी आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. अवध सिंग असे जखमी पोलिसाचे नाव असून त्याला वैद्यकीय उपचारासाठी विमानाने रांची येथे नेण्यात आले आहे. 
 
केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि झारखंड पोलिसांचे संयुक्त पथक लातेहार पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर होते. त्यावेळी ही चकमक उडाली. या मोहिमेत नक्षलवाद्यांपासून फुटलेल्या गटाचा प्रमुख लोहारा आणि त्याच्या सहकार्‍याचा समावेश होता, असे पलामूचे उपमहानिरीक्षक वाय.एस. रमेश यांनी सांगितले. लोहारा याच्या मृत साथीदाराचे नाव प्रभात गंजू आहे. त्याच्यावर पाच लाखांचे बक्षीस होते. या चकमकीत अन्य एक नक्षलवादी जखमी झाला. आशिष कुमार असे त्याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच, घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. लोहारा आणि त्याचे सहकारी जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर लातेहारचे पोलिस अधीक्षक कुमार गौरव यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलाच्या पथकाने शोध मोहीम हाती घेतली होती. चहुबाजूने वेढल्याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले, असेही ते म्हणाले. लोहरा हा लोहरदगा, गुमला, पलामू आणि लातेहार जिल्ह्यांत खून, खंडणी आणि जाळपोळीसह ९८ प्रकरणांमध्ये हवा होता. तर, गंझू १५ प्रकरणांमध्ये हवा होता.

Related Articles